यवतमाळ सामाजिक

विजयकुमार ठेंगेकर एक अष्ठपैलू व्यक्तिमत्त्व

विजयकुमार ठेंगेकर एक अष्ठपैलू व्यक्तिमत्त्व

विजयकुमार ठेंगेकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान

गांधी पिस फाऊंडेशन, नेपाळ द्वारा दिल्या जाणाऱ्या मानद डॉक्टरेट करीता यवतमाळ येथील लेखक, कथाकार तथा ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांची निवड झाली असून त्यांना पुणे येथे ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या पदवीदान समारंभात गांधी पिस फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा, समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे पद्मश्री विजयकुमार शहा, ऍड. डॉ. मंगेश नेने, आंतरराष्ट्रीय राजदूत आशा पाटील, आंतरराष्ट्रीय राजदूत डॉ. महेंद्र देशपांडे, भारत प्रभारी डॉ. सुनीलसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरेट आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्यावतीने कोमल साव (थोडगे) यांनी सन्मान स्विकारला.

विजयकुमार ठेंगेकर हे इयत्ता दहावी पासून साहित्य क्षेत्रात असून त्यांनी त्याच्या लेखनाची सुरुवात 1995 ला दैनिक देशोन्नती वृत्तपत्रातून केली. पुढे त्यांनी दैनिक लोकमत, देशोन्नती, हिंदुस्तान, नमो महाराष्ट्र, तरुण भारत, पुण्यनगरी, सकाळ, नवराष्ट्र, मातृभूमी इत्यादी स्तंभ लेखन करून समाजोद्धारासाठी आपली लेखणी चालविली आहे. यासोबतच महाराष्ट्रातील बहुतांश दिवाळी अंकांना साहित्य लेखन केले आहे. तर याच दरम्यान त्यांनी दैनिक नमो महाराष्ट्र व दैनिक हिंदुस्थान ला सहसंपादक म्हणून कामही पाहले आहे.

तसेच आकाशवाणी करिता कथालेखन, काव्य लेखन, नभोनाट्य, रूपक, बालनाट्य लेखन व फिल्मी गीतांच्या कार्यक्रमाचे लेखनही केले आहे.

तर त्याचे प्रेमांकुर” काव्यसंग्रह, “दस्तऐवज : माहितीचा अधिकार अधिनियम 2005” हे अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित झाले आहे. तर “पेटतं पाणी” हा मा. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांचा संदेश असलेला संपादित प्रातिनिधिक काव्यसंग्रह, “हरविलेलं चांदणं” हा कथा संग्रह, “शिंपल्यातील मोती” व “प्राजक्ताची फुले” हे वैचारिक लेखन संग्रह, “प्रितीचा खेळ न्यारा” ही कादंबरी असे साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

साहित्य क्षेत्रात त्यांनी अनेक पुरस्कार पटकाविले असून त्यात स्वर्गीय वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मा. मनोहरपंत जोशी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

तसेच हुंडा विरोधी चळवळ मुंबई द्वारा आयोजित राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ निबंध स्पर्धेत महाराष्ट्रातून सतत दोनदा प्रथम पुरस्कार व रोशनलाल तलवार ट्रॉफीचे मानकरी ठरले असून मुंबई विद्यापीठांमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

मनस्वी समाज निर्माण संस्था, नवरगाव ता. मारेगाव यांचा “काव्य श्री पुरस्कार”,

पुरोगामी विचार मंच, यवतमाळ द्वारा आयोजित विदर्भस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम पुरस्कार.

वृत्तपत्र लेखक संघटना, पुणे यांचा सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखन पुरस्कार,

मराठी भाषा संवर्धन बहुउद्देशीय संस्था ढाणकी तालुका उमरखेड यांच्या मराठी भाषा दिनानिमित्तच्या राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धेत प्रथम सन्मान प्राप्त केला आहे.

त्यांना या साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई द्वारा दिला जाणारा “राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2021” देऊन गौरविण्यात आले आहे.

तर ते जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती आर्णी येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आणि स्वतः च्या कल्पकतेतून बालकांपासून ते आबाल वृद्धांपर्यंतचे विविधांगी उपक्रम राबवून समाज कार्याचा वसा चालविलेला आहे.

एवढेच नाही तर विजयकुमार ठेंगेकर यांनी सुविचार ; संस्कार कलश हा Whatsapp Group गेल्या काही वर्षांपासून सुरू केला असून यातील सदस्य मंडळींच्या माध्यमातून वेळोवेळी विविध उपकर राबविले जाते. कार्य पार पाडले जाते. शिवाय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे, वह्यांचे, आणि आवश्यक त्याला सायकलींचे पण वाटप करण्यात येत आहे.

तसेच आपण कुणाच्या वाढदिवसाला किंवा लग्नाला गेलो तर पाकिटामध्ये किमान रुपये 500 तरी टाकून देतो परंतु एखाद्या रुग्णाला भेटायला गेल्यास आपण काहीच देत नाही मात्र रुपयांची खरी गरज असते ती त्या रुग्णासच… तेव्हा हे लक्ष हे लक्षात घेऊनच गंभीर आजारी आणि गरजू व्यक्तीस वेळोवेळी आर्थिक मदत ते करीत असतात.

वृद्धांना आधार देण्यासाठी म्हणून वृद्धाश्रमाची निर्मिती झाली आहे. मात्र या वृद्धाश्रमांना खूप काही अनुदान शासनाद्वारे दिले जात नाही. त्यांना सहकार्याची मोठी गरज असते हे लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील उमरी पठार येथील दोला महाराज वृद्धाश्रम व आर्णी येथील अनुसयाबाई नागपुरे वृद्धाश्रम यांना वेळोवेळी भांडी, कपडे, ब्लॅंकेट्स आणि अन्नदान या प्रकारची मदत वेळोवेळी त्यांच्याकडून करण्यात येते.

यवतमाळ येथे नंदादिप फाउंडेशन द्वारा बेघर मतिमंद मनोरुग्ण निवार केंद्र चालविले जाते. यामध्ये मनोरुग्णांवरती उपचार करून त्यांना बरे केले जाते आणि त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्त केले जाते . या कार्यामध्ये देखील तेथील रुग्णांसाठी अन्नदान आणि इतर मदतीचा हात त्यांना दिला जातो.

समाज कार्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नसल्याने आपल्या सरकारी सेवेच्या माध्यमातून गोरगरीबांची सेवा आणि गावाचा सर्वांगीण विकास यासाठी ते सातत्याने प्रयत्नरत असून या प्रशासकीय व साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी म्हणून त्यांना ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

आता माझी जबाबदारी वाढली आहे.

गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रेरित आणि डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि आर. आर. दिवाकर संस्थापक सदस्य असलेल्या गांधी पिस फाऊंडेशन ने माझ्या या छोट्याशा कार्याची दखल घेऊन मला आज मानद डॉक्टरेट प्रदान केलीत. एका चांगल्या प्रतिष्ठान कडून हा सन्मान मिळाल्याचे मला समाधान आहे. मात्र आता माझी जवाबदारी पण वाढली आहे. असे मत विजयकुमार ठेंगेकर यांनी या निमित्ताने व्यक्त केले.

Copyright ©