अभंग ” बेघरांचे घर “
बेघरांचे घर । जीवन आधार ॥
करू या उद्धार । बेघरांचा ॥ १ ॥
हरवले आभाळ । करावे ते काय ।
चिंताग्रस्त माय । बेघरांची ॥ २॥
उघड्यावरच । थंडीत उन्हात ।
भिजे पावसात । बारोमास ॥ ३॥
विचारे ना कोणी । पडलो आजारी ।
जीव रस्त्यावरी । पडलेला ॥ ४ ॥
कठीण हे झाले । जीवन जगणे ।
निवारा मागणे । राहायला ॥ ५ ॥
बेघरांचे घर । रेल्वेचा हा पूल ।
पेटेच ना चूल । उपाशीच ॥ ६ ॥
बेघरांचे घर । फूटपाथवर ।
नाही अंगावर । वस्त्रचिंधी॥ ७ ॥
कुडकुडतेय । वृद्धपणी काया ।
दाखवावी माया । कोणितरी ॥ ८ ॥
आधार केंद्रात। वृद्ध मायबाप ।
मुलाबाळा ताप । वाटतसे ॥ ९ ॥
मुलांनी बेघर । मायबाप केले ।
तया हाकलले । घरातून ॥ १० ॥
झालो मी बेघर । आलो रस्त्यावर ।
बेघर आधार । वृद्धपणी ॥ ११ ॥
सापडेना छत । ना घर ना दार ।
चोहिकडे वारं । फिरतसे ॥ १२ ॥
बेघरांनी आज । जगावे ते कसे? I
जीवनात नसे । रुची रस ॥ १३॥
मुलांनीच माझ्या। करुनी भिकारी
भीक रस्त्यावरी । मागतोय॥ १४ ॥
काय सांगू आता । होई जगताना ।
मरण यातना । जीवनात ॥ १५॥
जगावे ते कसे ? I जीने रस्त्यावर ।
समोर हा कर । भिक्षेसाठी ॥ १६ ॥
बेघर सांगतो । हाकलू नका ना ।
आई-वडिलांना । वृद्धपणी ॥ १७ ॥
बेकरांना घर । शोधुनिया द्यावे ।
आनंदात न्हावे । बेघरही ॥ १८ ॥
आधार दिला हा । आधार केंद्रानं ।
दिले जीवदानं । बेघरांना ॥ १९ ॥
बडनेरा गावी । बेघरांचे घर ।
जीवन आधार । बनलेले ॥ २० ॥
वृद्धपणी झाले । केंद्र मायबाप ।
जगण्याचा ताप । घालविला ॥ २१ ॥
सर्वांनीच द्यावी । बेघरांना साथ ।
चालवावा रथ । बेघरांचा ॥ २२ ॥
बेघर एकदा । बघूनच घ्यावे ।
आशीर्वाद द्यावे । बेघरांना ॥ २३ ॥
बेघर दिनाच्या ॥ हार्दिक शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । बेघरांना॥ २४ ॥
संत कबीर कविराज
राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
-: अभंगकार : –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती. भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
Add Comment