यवतमाळ सामाजिक

बैल पोळा शेतकऱ्यांचा आनंद सोहळा

बैल पोळा शेतकऱ्यांचा आनंद सोहळा

हरिश कुडे

नको रे पांडुरंगा, सोन्या चांदीच दानं.

एकदा भिजव रे, तहानलेल्या शेतकऱ्याचं रानं.

नको रे महादेवा, पुरण पोळीचं पानं,

धन्याच्या घरी वाजू दे, आनंदाचं गाणं.

मालकाच्या जिव्हाळ्यापोटी अशी आर्त विनवणी आपल्या हंबरण्यातून बैल निसर्ग निर्मात्याला करतो.

शेतकरी व बैल यांचं नातंच जगावेगळं. *दोघांनीही कष्टाशी घट्ट मैत्री बांधलेली.

धनी दिसला नाही तर तो रुंगुण (नाराज) राहील. बैल गेला तर मालक ढसाढसा रडेल. कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखं सुतकी वातावरण घरात असतं.

याचं अनेकांना नवल वाटेल पण हे भावनिक बंध आहेतच.

डार्विन चा उत्क्रांतीचा सिद्धांत माकडा पासून माणूस तयार झाल्याचे सांगतो. पण मला कधी कधी शंका येते. अनेक माणसे माकडा पासून झाली असेलही, मात्र शेतकऱ्यांची उत्क्रांती बैलापासून तर झाली नसेल ना?

शेतकरी आणि बैल जणू कष्टाचा वारसा कपाळावर गोंदवूनच पृथ्वीवर आलेत.

स्वतः मोडलो तरी चालेल, पण जग जगायला हवे. ही त्यांची ‘जागतीक प्रार्थना’!

पोळा हा श्रम प्रतिष्ठेच्या संस्कृतितील सर्वात मोठा उत्सव. भारतभर विविध नावांनी साजरा होणारा. या सणाची निर्मितीच मुळात बैलांच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी झालेली आहे. म्हणूनच एवढ्या भव्य प्रमाणात व नितांत आत्मीयतेने त्याची पुजा मांडली जाते. दुसऱ्या कुण्या प्राण्याचा असा सोहळा किमान माझ्यातरी ऐकिवात व पाहण्यात नाही.

शेतकऱ्यांच्या कुटुंबात आधी महिण्या भरापासून पोळा सण घरात आनंद घेऊन यायचा. बैलांची खास काळजी घेणे, बाशिंगे बनविने, झुला शिवने, तागाचे कासरे-वेसन वळणे, खोबळे, मासुरने, म्होरके, घंटा-घुंगरांचे पट्टे असा विविध साज तयार करण्यात सारे कुटुंब मग्न व्हायचे.

आता रेडीमेडचा जमाना.सारा साज बाजारात सहज मिळतो. त्यामुळे सणाची उत्सुकता, उत्साह, आनंदही कृत्रीम झाल्यासारखा भासतो. तरी प्रथा-परंपरा कायमच आहेत. तसा हा अतीशय अडचणीच्या काळात येणारा सण. मात्र पदरची काडीमोड करून शेतकरी हा सण मनोभावे साजरा करतात. एवढा उत्साह शेतकरी कुटुंबात दिवाळीतही नसतो. तो स्वतःला वा लेकरा-बाळांना कपडे शिवणार नाही, पण गड्याला नविन कपडे व बैलांचा साज घेण्यात अजिबात कसूर करित नाही.

पोळयाच्या आदल्या रात्री बैलाची आरती करुन (खांदेशेकनीचा दिवस) त्यांना ‘आज आवतंन घ्या, उद्या जेवाले या’ असं आमंत्रण दिलं जातं.

सकाळी बैलांना चारा-पाणी केल्यावर, नदी-नाल्यावर नेवून त्यांची आंघोळ घातली जाते. खराळा करणे, शिंगे घोळणे, रंग, बेगड, मथाटी, चौरे, बाशिंगे, घंटा, घुंगरे, मासुरणे, व झुलासह सारा साज चढऊन वाजत गाजत मारोतीला वेढा घालून बैलांना पोळ्यात नेले जाते.

गावचे पाटील, मुखंड (मानकरी), कोतवाल घाट (बेसन,हळद व लोण्याचे मिश्रण) वाटतात. सर्व बैलांना पाटला घरचा नैवद्य दिल्या जातो. तोरणावरुन खोबरा वाटी, करदोडे, धागेदोरे फेकल्या जाते.

गावातील सारे बैल उभे राहू शकेल असे लांब बेलपत्री बांधलेले तोरण असते. सारा गाव यावेळी भरल्या पोळ्यात सजलेल्या बैलजोड्यांचे निरिक्षण करीत फिरतात. जोडी मालकांचे कौतुक करतात. खास शैलीत झडत्याही म्हटल्या जातात. ह्या झडत्या उद्बोधक, व्यवस्थेवर ताशेरे ओढणाऱ्या, खोचक व विनोदिही असतात. यामुळे पोळ्यात मोठाच उत्साह संचारतो.

आभाळ गडगडे, शिंग फडफडे,

शिंगात पडले हो बाराखडे.

ते फेकले गावच्या रानी, तिथे निघाल्या लाल मातीच्या खाणी.

कोणी लावे हाताले, कोणी लावे छातिले.पाटलानं लावले हो शिंगशिंगोटीले.

वाटिरे वाटी खोबऱ्याची वाटी.

महादेव लढे भाववाढी साठी.

पार्वतीच्या लुगड्याले सतरा गाठी.

सरकार काही नाही करत हो शेतकऱ्यासाठी.

राशी रे राशी, धान्याच्या राशी.

कास्तकार उभा, व्यापाऱ्या पाशी.

दलाल तुपाशी, आमचे लेकरं उपाशी.

कसं जगावं हो हाशी खुशी.

मुंडक्याखाली दारिद्रयाची उशी, तुका घेतो हो कासऱ्यांन फाशी

एक नमन कवडा (गौरा) पारबती हरबरा हर हर महादेव. अशा बोली भाषेतल्या स्वरचित झडत्या म्हणजे ग्रामीण साहित्याची पर्वणीच!

सरतेशेवटी पाटील आरती करतो. तोरण हलवतो व पोळा फुटतो.

कोणी दुडु दुडु तर कोणी भरधाव वेगाने स्पर्धा असल्यागत बैल पळवतात. पोळ्यातून घरी आल्यावर बैलांची पुजा होते. गावात पाच घरी ओवाळणी साठी बैलजोडी फिरवतात. व नंतर पंचपक्वांनाची अंगत-पंगत सजते.

मनाला भुरळ घालणारा!

जात धर्म पंथाचा अभिनिवेश नसणारा! सामाजिक विवेकाचा जागर मांडणारा!

प्राणिमात्रां प्रती दयाभाव रुजविणारा! हा सण शेतकरी हर्षोल्हासाने साजरा करतात.

पण या जगाच्या पोशिंद्याचा मनोभावे ‘सन्मान’ होतांना आम्ही आजतागायत पाहिला नाही. निढळीचा घाम भडुळीत जाईपर्यंत तो कष्ट उपसतो. तरी ‘गरिबीचं तोरण’ त्याच्या आडयाला टांगलेलं.

एक पूर गेलातरी तो उध्वस्त होतो. एक धुव्वारी पडली की त्याचा धुव्वा उडतो. एका पोरीच्या लग्नातच ब्लडप्रेशर वाढते. आर्थिक हलाखिमुळे शेतकरी चाळीशीतच म्हातारा दिसतो.

कुटुंबाची वाताहत असह्य झाली, की मग बापलेकं एकाच झाडाला फाशी घेतात. एकाच सरणावर जाळून घेतात, कधी कधीतर अख्ख कुटुंबच विष घेतं. समाजमन सुन्न करणाऱ्या ह्या घटना. देशासाठी लाजिरवाण्या आहेत. पण सरकार निलाजरे झाले आहे. ते अजूनही जर कष्टकरी बापाच्या चरणात राम व मायच्या चरणात सीता शोधत नसेल तर मंदिरात नुसता घंटा सापडेल. देव तिथे नाहीच! तो तर श्रमिकांच्या रुपात शेता-बांधावर राबतो आहे. कांदा भाकरी खातो आहे.

‘तूच विश्वाचे अधिष्ठान’

असे संबोधून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता शेतकऱ्यास अर्पण करतांना म्हणतात,

सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्नवस्त्र पात्रादी द्यावे!

परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा!

कष्ट करोनी महाल बांधिसी, परी झोपडीही नाही नेटकिशी!

तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुजकडे वळो!

जगातल्या सर्व राजकीय, प्रशासकीय व्यवस्था बघा. अध्यक्षीय राजवट, साम्यवादी, भांडवलशाही, हुकुमशाही, लोकशाही ह्या कुठल्याही व्यवस्थेतील, कुण्यातरी राज्यकर्त्यांचे लक्ष याकडे वळले का?

एव्हढे विज्ञान प्रगत झाले, सर्व वस्तू कारखाण्यात तयार करता येतात. टेस्टट्यूब मधे बेबीही जन्मास घालता येतो. पण धान्य कारखाण्यात पिकवता येत नाही, ते कष्टकऱ्यांचा घाम व माती याच्या संयोगातूनच निर्माण होते. याचे भान सदैव असावे.

कोरोना महामारीच्या काळात सारं जग घरात लॉक होतं. मात्र महादेव-पाराबती व त्याचा ढवळ्या-पवळ्या अनलॉक होता. त्यांना कॉरेंनटाईन होताच आले नाही. ते सतत कामातच व्यस्त होते. त्यांनी जर कष्टाला लॉकडाऊन केले तर? उमासमारी सारखी भयान महामारी कुठली असेल?

शेतकऱ्यांची तरुण पिढी बेरोजगार आहे. आर्थिक विवंचनेत वाढते आहे. अपार श्रम करूनही त्यांचे जगणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या सारखेही नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाला श्रेणी कोणती? त्यांच्या कष्टाची श्रेणी निच्छित करण्याची, राज्यकर्त्यांची मानसिकता तयार व्हावी! त्यांच्याही मेंदूत माणुसकीचा पोळा भरावा. त्यांच्या तनामनात कष्टकऱ्यांच्या मांगल्याचे तोरण बांधले जावे. अशी सुबुद्धी यावी.

ग्रामीण शेतकरी अशिक्षीत होता. तो कष्टाच्या शाळेत शिकला. शेतमाल पिकवतो आणि जगाला जगवतो. त्याला बाजार जमला नाही. बाजारात तो लुटल्याच चालला. झाली तेव्हढी फसवणूक व पिळवणूक तो सहन करत आला. आता त्यांची मुलं शिकली. हातातील पेनाची, बापाच्या रुमण्याची व महात्मा फुलेंच्या आसुडाची ताकद त्यांना उमगली.

आता राज्यकर्त्यांनी केवळ योजनांचे देखावे व आश्वासनांचे भोंगे वाजवू नये. शेतीसाठीही स्वतंत्र अर्थसंकल्प द्यावा. मालाला भाव मिळावा. अन्यथा तरुणाईचा हल्लाबोल कुणालाही परवडणारा नसेल!

पोरांना वाटते राबणाऱ्या बैलांची पुजा माझा बाप करतो. पण माझ्या बापाच्या कष्टाचे मोल व्यवस्थेने का जाणले नाही?

माझा बाप या धुऱ्यावरुन त्या धुरऱ्यावर आयुष्यभर धावाला. पण त्याच्या धावा कुणी मोजल्या का नाहीत?

तेंडुलकरला भारतरत्न तर माझ्या बापाला मरणरत्न का?

प्रश्न साहजिकच आहे.

√ शेतकऱ्यांच्याही घामाच्या थेंबाचा हिशोब व्हावा.

√ आटलेल्या रक्ताचेही मोल व्हावे.

√ रूतणाऱ्या काटयांची व विंचवांच्या डंखांचीही नोंद व्हावी.

√ ऊन, वारा, थंडी, पावसातील ओव्हर टाईमचाही चुकारा व्हावा.

जमेल तर शेतमालाचे भाव ठरवतांना याचेही मुल्यांकन होऊ द्यावे.जगाचा पोशिंदा देणारा आहे. उदार अंतःकरणाचा आहे. यापेक्षा तो अधिक मागणार नाहीच.

या बैलपोळ्याच्या मंगल पर्वावर शेतकऱ्यांच्या वेदना, हुंकार व दुःखाचा हिशोब ईथे मांडण्याचा अल्पसा प्रयत्न केला.

मारबतीला विनंती करावी लागेल.

रोगराई ने रे मारबत.

बेरोजगारी, महागाई ने रे मारबत.

सामाजीक अविवेक ने रे मारबत.

शेतकऱ्यांचं दारिद्रय ने रे मारबत.

◆हा श्रमप्रतिष्ठेचा पोळा

विवेकाचा सोहळा.

हा एकोप्याचा पोळा

उत्साहाचा सोहळा.

हा माणुसकीचा पोळा

आनंद सोहळा.

हा पोळा आपल्या कुटुंबात सदैव समृद्धी पेरत राहो! जगाचा पोशिंद्याला गतवैभव प्राप्त होवो! या सार्थ अपेक्षेसह सर्व भारतीयांना पोळ्याच्या अनंत शुभेच्छा!

!!बा श्रमिका!!

तूच युगाचा स्मशानयोगी!

तूच महर्षी श्रमत्यागी!

तुझ्या कष्टाला मोगऱ्याचा वास!

तुझ्या देहात विश्वाचा निवास!

हरीश पुंडलीकराव कुडे

जवळा,ता.आर्णी, जी.यवतमाळ.

9850301134 8830254240

Copyright ©