महाराष्ट्र सामाजिक

अंत्योदय कार्ड बंद केल्याने अपंग बांधव शासकीय योजनांपासून वंचित

वर्धा प्रतिनिधी पंकज तडस 

अंत्योदय कार्ड बंद केल्याने अपंग बांधव शासकीय योजनांपासून वंचित

अपंग बांधवाना दिल्या गेलेले अंत्योदय कार्ड पुरवठा अधिकाऱ्यांनी बंद केले, त्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित झालेल्या तालुक्यातील अपंग बांधवांमधून रोष व्यक्त होत आहे. याबाबत तहसीलदार यांना प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन सादर केले आहे.

शासकीय योजनेंतर्गत अपंग बांधवांना अत्योदय कार्ड देण्यात आले होते. त्या कार्डवर महिन्याला ३५ किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात येत होते. अपंगासाठी शासन विविध योजना राबवित त्यांना मदतीचा हात दिला जात असल्याचे सांगण्यात येते. मात्र येथे ज्या अपंगांना अंत्योदय कार्ड देण्यात आले होते, ते येथे बंद करण्यात आले आहे. यामुळे अपंग बांधवांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे अपंगांना मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. सिंदी येथील प्रभाकर राऊत हे ४२ टक्के अपंग आहे तर त्यांच्या पत्नी या ५१ टक्के अपंग आहे. त्यांच्याकडे पत्नीच्या नावाने अंत्योदय योजनेचे कार्ड होते. ते कार्ड आता बंद करण्यात आल. अनेक अपंग बांधव असे आहेत की, त्यांच्याकडे अंत्योदय कार्ड आजही उपलब्ध नाही. ज्यांचकडे कार्ड आहे ते आता बंद करण्यात येत असल्याने मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून त्यांच्यावर वंचित राहण्याची वेळ आली आहे. हा अपंग बांधवावर अन्याय आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची होत असलेली अडवणूक पाहता शासनाप्रती अपंग बांधवांमध्ये अंसतोष निर्माण होत आहे. येथील पुरवठा विभागाकडून तालुक्यातील शंभरच्यावर अपंग बांधवांचे अंत्योदय कार्ड बंद केल्याची माहिती आहे.

याबाबत प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार सेलू यांना निवेदन सादर केले असून अपंगांची परिस्थिती पाहता त्यांना अंत्योदय कार्ड देण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Copyright ©