यवतमाळ सामाजिक

राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी

राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी

प्रवचनकार मिलिंद चवंडके यांचे प्रतिपादन

पाथर्डी – राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर साहित्याचे आणि नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार श्री. मिलिंद चवंडके यांनी केले.

येथील जिरेसाळ गल्लीतील श्रीपिनाकेश्वर मंदिरात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनसोहळ्यात ते बोलत होते. सदगुरू शंकर महाराज मठाचे अधिपती प.पू. श्री. माधवबाबा यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजाच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष जिरेसाळ यांनी

प्रास्ताविक करताना समतावादी युगपुरूष महात्मा बसवेश्वरांची ९१९ वी जयंती आपण साजरी करतो आहोत, अशी माहिती दिली. श्री. राजेंद्र उदारे यांनी सूत्र संचालन केले. बसवेश्वर जयंतीची महत्वपूर्ण दासोह सेवा श्री. सचिन फुटाणे यांनी केली. श्री. संजय चेलवे यांनी आभार मानले.

प्रवचन सोहळ्यास सर्वश्री प्रभाकर ईजारे, सुहास शेळगावकर, पत्रकार विजय शिवगजे, संजय पैठणकर, सोन्याबापू मुदळ, नंदकुमार डाळिंबकर, सुनिलराव फळे, दत्ता होनमुने, बाळासाहेब जिरेसाळ, संतोष बुरसे, गजानन तारापूरे, विठ्ठलराव हंपे, सचिन साखरे, गणेश पैठणकर, संजय स्वामी, महेश फुलशेटे, शिवाजी कंगे, दत्तात्रय टेंभूरकर, गणेश जंगम, लखन जंगम, शुभम जिरेसाळ, सौ.सुरेखा शेटे, सौ.रेणुका फुलशेटे, सौ.रूपाली आगलावे यांच्यासह स्त्री-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक-युवतींची लक्षणिय उपस्थिती होती.

प्रवचन करताना श्री.चवंडके पुढे म्हणाले, वैशाख शुध्द तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिन. श्रावण शुध्द पंचमी म्हणजेच नागपंचमी हा बसव पंचमी अशी ओळख असलेला हा लिंगैक्य दिन आहे. बसवकल्याण (जि.विजयपूर) ही त्यांची जन्मभूमी. मंगळवेढा (जि.सोलापूर) व बसवकल्याण (जि.बिदर) या दोन्हीही कर्मभूमी आणि कुडलसंगम (जि.बागलकोट) ही लिंगैक्य भूमी आहे. या भूमीत नतमस्तक होताना आजही स्फूर्ती मिळते.

चालुक्य आणि कलचुरी ही मध्ययुगीन भारतातील दोन प्रमुख राजघराणी होती. चालुक्य राजाची राजधानी कल्याण होती तर मंगळवेढा ही कलचुरी राजाची राजधानी होती. इ.स.११३२ ते ११५३ या २१ वर्षाच्या कालखंडात बसवेश्वरांनी मंगळवेढा राज्याची सत्तासूत्रे समर्थपणे सांभाळली. त्यानंतर त्यांनी कल्याण राज्याचे पंतप्रधानपद भूषविले. भारतीय प्रशासन व्यवस्थेतील ते पहिले पंतप्रधान ठरले. कल्याण येथे बसवेश्वरांनी ७०० पुरूष आणि ७० महिला सदस्य असलेली अनुभव मंटप ही जगातील पहिली लोकसभा-पहिली संसद निर्माण केली. मध्ययुगीन भारताच्या ऐतिहिसिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक, राजकीय आणि सामाजिक जीवनातील महापुरूष असलेले महात्मा बसवेश्वर मध्ययुगीन भारताचे जनकच होत. धर्म, अध्यात्म, तत्वज्ञान, संस्कृती, शिक्षण, साहित्य, अर्थकारण, राजकारण आदी क्षेत्रात बसवेश्वरांनी आपल्या मूलगामी व दूरगामी विचार कार्याचा भरीव ठसा उमटवला. लिंगायत धर्मीयांनी आपल्या धर्मातील कोणत्याही जातीमध्ये विवाह करावा, मात्र धर्म पाळावा, हा त्यांचा विचार कल्याण क्रांतीची नांदी ठरला. कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मास मान्यता दिली ते बसवेश्वरांचे कार्य समजून घेतल्यानेच!

व्यक्ती, कुटूंब आणि समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मानवी सामाजिक मूल्यांचा दीपस्तंभ म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. त्यांचे वचन साहित्य जीवनतारक संदेश देणारे आणि आजच्या काळातही मार्गदर्शन करणारे आहे. कायकवे कैलास, दया धर्माचे मूळ, सदाचार हाचि स्वर्ग, अनुभव हाच गुरू ही त्यांच्या वचनसाहित्यातील वाक्ये प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य व्यापक, विविधांगी, क्रांतीकारक आणि सर्वसमावेशक आहे. कन्नड भाषेतील त्यांचे साहित्य तब्बल ९०० वर्षे कन्नड भाषेपुरतेच मर्यादित राहिले. बसव समितीने पुढाकार घेऊन ३४ भाषांमध्ये ते भाषांतरीत करण्याची कामगिरी बजावली. त्यात इंग्रजी, अरेबिक, पर्शियन, फ्रेंच, चिनी, नेपाळी, कोरियन आदी परकीय भाषांचाही समावेश आहे. आज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पोलंड, दुबई, अमेरिका आदी ३५ देशांमध्ये बसवेश्वरांची जयंती साजरी होत आहे. बसवेश्वरांनी शिवोपासना, दया, दासोह, श्रमश्रेष्ठता, मातृभाषेमधून शिक्षण प्रसार, दीनोध्दार, स्त्रीधर्म स्वातंत्र्य अशा सामाजिक मूल्यांचा स्वीकार केला. बसवेश्वरांची ही लिंगायत संस्कृती घरा-घरात श्रध्देने जपली गेल्यास हिंदू राष्ट्र निर्मितीत ही शिवभक्त कुटूंबे निश्चितच महत्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करताना आपण लिंगायत धर्मात जन्मलो याचा जीवनभर अभिमान बाळगून लिंगायत संस्कृतीचे जतन करा, असे आवाहनही श्री.चवंडके यांनी केले.

Copyright ©