यवतमाळ राजकीय

यवतमाळ शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन लिफ्टिंग, व कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा हल्लाबोल

यवतमाळ शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन लिफ्टिंग, व कोलमडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर मनसेचा हल्लाबोल

मनसेचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन

अलिकडच्या काळात यवतमाळ शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने यवतमाळ शहरात चेनलिफ्टींगच्या घटना पुन्हा घडत आहे. मागील घटनांमध्ये सुद्धा पोलिस यंत्रणेला गुन्हेगारांना पकडण्यात पाहिजे तसे यश मिळाले नव्हते, म्हणूनच या गुन्हेगारांनी पुन्हा ऐन लग्न सराईच्या काळात चेनलिफ्टींगचे उद्योग पुन्हा सुरू केले आहे. या सर्व विषयाची गंभीर दाखल घेत मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांची आज भेट घेऊन या सर्व विषयावर चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.

शहरातील महिला, वयोवृद्ध नागरिक सकाळ व सायंकाळी फेरफटका मारत असतांना असुरक्षित असल्याची भावना व्यक्त करीत आहेत. त्यातच यवतमाळ शहरातील सोनार लाईन, इंदिरागांधी मार्केट, बसस्टँड चौक, आर्णि रोड आणि प्रवासादरम्यान सुद्धा अनेक चोरीच्या घटना या लहान मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यातच यवतमाळ शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारी प्रवृत्तीने तोंड वर काढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. कारण नुकतेच बसस्थानक चौक, स्टेट बँक चौक, आर्णि रोड, वडगांव परिसर या भागांमध्ये अनेक टोळक्यांनी धुडघुस घातल्याच्या घटना अनेक वृत्तपत्रात झळकत आहेत. अशा वातावरणामध्ये यवतमाळकर नागरिक खरच सुरक्षित आहे का..? हा सवाल मनसेचे अनिल हमदापुरे यांनी आज मनसेच्या शिष्टमंडळासह पोलिस प्रशासनाला विचारला.

यवतमाळ जिल्ह्यात परराज्यातून येणाऱ्या तसेच वास्तव्यास भाडेतत्त्वावर राहणाऱ्या कुठल्याच नागरिकांचा पोलीस दप्तरी नोंद नसल्याची माहिती मनसेचे अनिल हमदापुरे यांनी पोलीस अप्पर अधीक्षकांना दिली. आपल्या शहरांमध्ये कोण फिरत आहेत गुन्हेगार की व्यवसायाच्या, रोजमजुरीच्या नावावर आपले बस्तान थाटणारे परप्रांतीय,हा विषय गंभीर असून तात्काळ यावर उपाययोजना करत सर्व पोलीस स्टेशनला याबाबत सूचना करण्याची मागणी मनसेने केली. यवतमाळ शहरामध्ये आर्णि रोड, मेन लाईन, इंदिरा गांधी मार्केट, दत्त चौक आणि प्रामुख्याने जाजू चौक व दत्त चौकातील भाजी व फळ मार्केट या परिसरात कुठल्याही स्वरूपात यवतमाळ शहरामध्ये वाहतूक पोलिस यंत्रणा कार्यरत आहे असे चित्र कुठेच दिसत नाही. या विषयी वारंवार वाहतूक पोलिस शिपायांना सुचना करूनही त्यांचे हितसंबंध जोपासण्यात त्यांची धन्यता आहे.कारण आर्णि रोड,जाजू चौक, अणे महाविद्यालय ते स्वामी विवेकानंद विद्यालय या मार्गावर रोज सर्वसामान्य नागरिकांना वाट काढतांना अनेक अपघात, वादविवाद, भांडण, या सर्व गोष्टी रोजच्या झालेल्या आहे. सर्व घटना घडत असतांना वाहतूक पोलिस यंत्रणा नेमकी कुठे व्यस्त असते ? हा सवाल सर्वसामान्य जनता विचारत आहे. वाहतूक पोलिस मात्र शहरातील बायपास, बाहेरगावावरून ये-जा करणार्‍या नागरिकांच्या मार्गावर न चुकता खडा पहारा देत दिसतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व यवतमाळकर जनतेच्या हितासाठी या निवेदनाद्वारे यवतमाळ शहरातील गावगुंड, चेनलिफ्टींग, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच शहरातील उडानटप्पु चिडीमारांचा त्वरित बंदोबस्त करून यवतमाळ शहरातील वाहतूक व्यवस्थेवर एक वचक निर्माण करावा जेणे करून यवतमाळकर जनतेचा पोलिस प्रशासनावरील असलेला विश्वास हा कायम राहत सर्वसामान्य नागरिक गुन्यागोविंदाने आपले जीवन जगेल, अशी अपेक्षा अनिल हमदापुरे यांनी व्यक्त केली. यावर पोलीस अप्पर अधीक्षक जगताप साहेब यांनी हे सर्व विषय गंभीर स्वरूपाचे असून लवकरच यावर पोलिस यंत्रणा कडक पावले उचलणार आणि शहरातील वाहतूक व्यवस्था व परराज्यातून येणाऱ्या नागरिकांची तात्काळ जिल्ह्यात माहिती घेऊन सर्व नागरिकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेणार असल्याची माहिती या प्रसंगी दिली.या सर्व विषयांवर गांर्भियाने विचार न झाल्यास जनहितासाठी मनसेच्या वतीने शहरातील या सर्व गुन्हेगारीविरूद्ध मनसे स्टाईलने बंदोबस्त करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्या जाईल त्याला सर्वस्वीपणे पोलिस प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा याप्रसंगी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला. या शिष्टमंडळात प्रामुख्याने गोपाल घोडमारे, लकी छांगाणी, शिवम नांदुरकर, नीरज देशपांडे,सौरभ अनसिंगकर, प्रीतम मीठे, मयूर बेलेकर यासह इतर मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©